राजकीय

शिवसेना आणि शिवसैनिक

Spread the love

शिवसेना कोणाची ? उध्दव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची ? असे अनेक प्रश्न आता राजकारणात निर्माण झाले आहेत. शिवसेना कोणाची यावर सध्या वाद सुरू आहे. तो विधिमंडळ सचिवांच्या निर्णयावर अवलंबून आहे. मात्र इथे या विषयाचा शेवट होईल असे नाही. यानंतर निवडणूक आयोगाकडे अहवाल जाईल. कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये ही हा वाद जाऊ शकतो. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जवळपास 41 विधिमंडळ सदस्य त्यांच्या बाजूने गेले. अगदी दहा ते बारा आमदार उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत.तसेच विधिमंडळात बहुमताचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांची सरशी झाली आहे. आपल्याकडे पक्षाचे व्हीप कोणी द्यावेत, ते पक्षाच्या लोकप्रतिनिधींना कसे लागू होतात? पक्षाच्या विविध जिल्हा, शहर प्रमुखांच्या इतर पदाधिकार्‍यांच्या नेमणुका कोणी कशा कराव्यात? याविषयीच्या नियमावली आहेत. प्रत्येक पक्षांनं पक्षाची नोंदणी निवडणूक आयोगाकडे करताना पक्ष कशा पद्धतीने चालवला जाईल याविषयी माहिती दिली आहे.आता शिवसेना नक्की कोणाची? असा प्रश्न शिवसेनेवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. ठाकरे घराण्यावर या सर्व शिवसैनिकांचे प्रेम आहे. बंडखोर शिवसेना आमदारांनीही अद्याप ठाकरे कुटुंबियांविरुद्ध अनुद्गार काढलेले नाहीत. बाळासाहेबांचीच विचारसरणी आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं वारंवार सांगितलं जातय. इकडे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना हे मान्य नाही.तसेच न्यायालयाचा किंवा निवडणूक आयोगाचा काय व्हायचा तो निर्णय होईल पण शिवसैनिक मात्र यामध्ये भरडला गेलाय. त्याची मानसिक स्थिती गोंधळमय झाली आहे. बाळासाहेबांनी आवाज दिला आणि लाख शिवसैनिकांचे हात वर गेले, प्रतिसाद मिळाला असं आजवरचं दृश्य. मातोश्रीमधून कोणत्याही घटनेनंतर काय आदेश येतो याची प्रतिक्षा आणि नंतर कोणतीही भिडभाड न ठेवता अंमलबजावणी करावी इतकंच काय ते शिवसैनिकांना आजवर ज्ञात. मध्यंतरी शिवसेनेत राज आणि उद्धव असे गट पडले. पण बाळासाहेब उद्धव यांच्या पाठीशी होते यामुळे अनेक शिवसैनिकांनी खरी शिवसेना ही बाळासाहेबांचीच असं मानून कार्य केलं. आत्ताच्या बंडानंतर बाळासाहेब नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अनेक शहर, जिल्ह्यातून शिवसैनिकांचा पाठिंबा असल्याचं वृत्तांत येत आहेत. एकनाथ शिंदेे म्हणतात, आमचीच खरी शिवसेना पण त्यांना हे माहित आहे आपली शिवसेना ही उध्दव ठाकरे यांना वगळून असल्याने शिवसैनिकांना हे सहजासहजी मान्य होईल असं नाही. ते आता सत्तेवर आहेत म्हणून आमदार, लोकप्रतिनिधी, खासदार यांचीच त्यांच्या पारड्यात गर्दी आहे. सामान्य शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहे का? हा खरा सवाल आहे. शिवसेनेची हीच खरी ताकद आहे. आजवर शिवसेनेचा इतिहास पाहिला तर बंडखोर फार काळ यशस्वी ठरलेला नाही. गेल्या एका निवडणुकीत तर सर्व बंडखोर पराभूत झाले होते. ज्यांना काँग्रेस किंवा अन्य पक्षांनी थारा दिला तीच मंडळी आता राजकारणामध्ये काहीसं अस्तित्व जपून आहेत. छगन भुजबळ यांनीही शिवसेना सहजासहजी संपणार नाही असं वक्तव्य अलीकडे केलं. ते पूर्वीचे बंडखोर शिवसैनिक आहेत.त्यांच्या सारखा अनुभव अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेने बाबत घेतला आहे. शिवसेना संपेल की नाही ते आगामी निवडणुकीत कळेलच.पण सद्यस्थितीत शिवसेना कमकुवत झाली आहे. शिवसेनेचे नेतृत्व अधिक अडचणीत आलं आहे. शिवसेना कोणाची हे सत्य उद्धव ठाकरे यांनी मान्य करायला हवं. राजकारणामध्ये अनेकदा मनाविरुद्ध काही तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते. तेवढी व्यापकता उध्दव ठाकरे दाखवतील अशी स्थिती नाही. शिवसैनिकांना विचारलं तुम्ही उध्दव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक तर हा भाबडा शिवसैनिक आम्ही आदरणीय बाळासाहेबांचे असे उत्तर देतो. हे मात्र निश्चितच खरे आहे.

लक्ष्मण राजे
मीरा रोड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!