आरोग्य व शिक्षण

हम जंग न होने देंगे ! हेची आपुले परमकर्तव्य असे – लेखक हर्षल आल्पे

Spread the love

आवाज न्यूज : सध्या जे काही सुरू आहे , ते भीषण आहे , युक्रेन मध्ये रशिया ने सुरू केलेल्या युद्धाने मिळाले काय ? हाच प्रश्न हे सगळे घडत असलेले बघत असताना पडतोय . हां ! आता काही लोक मस्करीत म्हणतात , की आपला काय संबंध ? या सगळ्याशी , आपली माध्यमं उगाचच याला महत्व देत आहेत . अशांना याचे गांभीर्य कळत नाहीये , कधी कधी दूर चाललेल्या एखाद्या छोट्या घटनेचे ही फार दूरगामी परिणाम सगळ्यांना भोगावे लागू शकतात , इथे तर जगातला सर्वात शक्तीशाली देशांमध्ये अग्रस्थान असलेला देश रशिया , युक्रेन नावाच्या छोट्या आणि विकसनशील गटात मोडणार्या देशावर भीषण हल्ला करतो , कारण काय सांगितले जाते , तर आपले वर्चस्व आपल्या आजूबाजूच्या देशांवर राहावे , आपले प्रभुत्व सिद्ध करण्याचा निव्वळ अट्टाहास करत राहातोय . आणि त्यात ही हे युद्ध फक्त दोन सैन्यांमध्ये होत नाहीये , तर हे युद्ध सर्वसामान्य लोकांच्या दारापर्यंत , घरापर्यंत ,पार त्यांच्या घरात घुसले आहे . मानवतावादी  दृष्टीकोनाने जर बघायला गेले , तर प्रत्येकच संवेदनशील माणसाला युक्रेन मधील दृश्य मनाला चटका लावून जातात . त्यात आपला जीव वाचून पळणा-या लोकांना पाहिले की , हे जीवन च मिथ्या आहे की काय ? समोर दिसणारा मृत्यू हा आपल्याकडून काहीही करून घेऊ शकतो . हेच या सगळ्यातून आपल्याला दिसते . आणि अहो ! हा वर्चस्ववाद तरी का करायचा ? कशासाठी , आणि अशाने थोडीच सिद्ध होतो . .तुमचा वर्चस्ववाद , हा एक तात्पुरता अट्टाहास झाला , कायम कोणीच या जगावर राज्य करू शकत नाही . खूप लोकांचा गैरसमज असेल ही की आयुष्यात आपण खूप काही मिळवले . पण दिवसाच्या , आयुष्याच्या शेवटी आपण सगळेच समान असतो . आणि ह्या देहाचा नाश व्हायला काही ही लागत नाही , एक पांढरे शुभ्र कापड ही पुरते . मग आपण जे मिळवलेले असते , ते मिळवण्यासाठी जी काही कृत्ये , पाप , पुण्य केलेले असते त्या सगळ्याचा तेव्हा काहीच उपयोग होत नाही . वाचणार्याजना हे सगळेच एका वेगळ्या पातळीवर चाललेले वाटेलही पण ते सत्य आहे .

ब्लादीमिर पुतीन या रशिया च्या सर्वेसर्वा असलेल्या नेत्याच्या अमेरिकेच्या महासत्तेला आव्हान देण्याच्या जिद्दीमुळे आपल्या सर्वांनाच याचे परिणाम भोगावे लागत आहेत .ते असे
1 : हा लेख तुमच्या पर्यंत येई पर्यंत व्यावसायिक गॅस चे भाव गगनाला भिडले आहेत , आणि पर्यायाने आपले घरगुती गॅस ही भडकण्याची चिन्हे आहेत
2 : खाद्य तेल ही महागण्याची चिन्हे आहेतच . याचा थेट आपल्या जेवण्यावर परिणाम होत आहे .
3 : शिवाय महागाई सर्व प्रकाराने वाढणार आहे , त्यावर नियंत्रण मिळवणे कुठल्याही सरकारला एक प्रकारचे दिव्यच आहे .
4 : जे भारतीय तरुण तरुणी तिथे शिकायला गेले होते , त्यांना सर्वप्रथम आपल्या देशात सुखरूप आणून ,त्यांच्या भविष्याची नव्याने तरतूद करावी लागणार आहे . कारण या सगळ्यातून त्यांच्या भविष्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहणार आहे . त्यांना आपल्या शिक्षणव्यवस्थेत नव्याने सामील करून घेणे मोठे जिकरीचे काम आहे .
5 : जे तरुण तरुणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेले असतील त्यांना ही विद्यार्थ्यांप्रमाणेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही आव्हानात्मक आहे .

अजून असे बरेच मुद्दे आहेत जे मांडता येतील , आणि या सगळ्याचा विचार करता असे म्हणताच येत नाही की , दोन देशांच्या चाललेल्या युद्धामध्ये आपला काहीच संबंध नाही . हे प्रकरण तेव्हा अधिकच गंभीर बनते , ज्यावेळी यातला एक देश अण्वस्त्र वापरण्याची सज्जता दाखवतो . आणि हा तो देश असतो , ज्याच्याकडे आजच्या तारखेला सर्वाधिक घातक अण्वस्त्रे सर्वात जास्त आहेत . काही किलो अण्वस्त्रे जपान मधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांची बर्बादी 1945 साली करून गेली होती , लाखो माणसे त्यात मृत्यूमुखी पडली होती . आताची एक एक अण्वस्त्रे जग नष्ट करायला पुरेशी ठरू शकतात . आणि आज जवळ जवळ प्रत्येक च देशाकडे थोड्या बहुत प्रमाणात अशी अण्वस्त्रे आहेत . एकदा का युद्ध या पातळीवर उतरले , तर जगाचा विनाश निश्चित च होणार आहे . त्यामुले गोष्टी सामोपचाराने , चर्चेनेच सोडवल्या गेल्या पाहिजेत . जिथे दोन देशात युद्धजन्य परिस्थिति असेल तिथे त्यांनी ही मानवतावादी दृष्टीकोन लक्षात घेऊन पाऊले टाकावीत हेच खरे .
निदान एक माणूस म्हणून असेच वाटायला हवे , कारण शेवटी आपण एक समाज आहोत . समूहातले एक घटक आहोत . आणि हे जग खूप विविधतेने नटलेले आहे , त्याचे सौन्दर्य आपणच अबाधित ठेवायला हवे . ती जवाबदारी जास्त मोठी आहे .
इतकेच …..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!