आरोग्य व शिक्षण

आणि बाहू स्फुरण पावले…..अपराजिता कलापिनीचा अनोखा महिलादिन

Spread the love

तळेगाव : दर वर्षी महिलादिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्याच्या कलापिनी प्रथेला अनुसरून या वर्षीही कलापिनीचा महिलादिन अत्यंत वेगळ्या रीतीने साजरा झाला.अपर्णाताई खोत आणि अंजलीताई सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. महिला दिनाच्या मुहूर्तावर कलापिनीच्या शं.वा.परांजपे संकुलातील पाचव्या रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले. हा खुला रंगमंच अश्या प्रकारच्या कार्यक्रमासाठी सुयोग्य असा आहे .

 

कार्यक्रमांच्या सुरुवातीला अनघाताई बुरसे आणि त्यांच्या समूहातील स्त्रियांनी नवदुर्गा स्तोत्र सादर केले. यामधे भारतातील विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रिया,जसे की लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ, कल्पना चावला इ. अनेक व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. यामध्ये अंजली सहस्रबुद्धे, रश्मी पांढरे, उषा धारणे,दिपाली जोशी, दीप्ती आठवले, वंदना चेरेकर, केतकी लिमये, अनघा बुरसे, धनश्री कांबळे, ज्योती ढमाले, प्रीती शिंदे, अनघा कुलकर्णी, मधुवंती रानडे यांचा सहभाग होता.

त्यानंतर ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेत सलग तीन वर्षे बक्षिसे पटकावणारी तळेगावची ज्ञानदा भिडे हिने सावरकरांच्या कार्याचा गौरव करणारे तडफदार भाषण सादर केले. या चिमुकलीने तिच्या भाषेवरील प्रभुत्त्वाने, सावरकरनिष्ठा,खणखणीत आवाज आणि काव्यपंक्तीचा सहज वापर यामुळे रसिकांची मने जिंकुन घेतली.

कार्याध्यक्ष अंजलीताई सहस्त्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अपर्णाताई खोत यांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि अगदी मोजक्या-नेमक्या शब्दात मनोगत व्यक्त केले. त्यानंतर रंगमंचाच्या दोन्ही बाजुंनी हातात पेटत्या मशाली घेऊन दोन तरूणींनी प्रवेश केला, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मीनलताई कुलकर्णी यांचे पथनाट्य ‘ अपराजिता ‘ सुरू झाले. टाळ्यांचा कडकडाट नाट्य संपेतो अधूनमधून चालूच होता!! मीनलताई आणि त्यांच्या सृजन नृत्यालयातील स्त्रीवर्गाने पुढचा अर्धा ते पाऊण तास प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणा-या अनेक ज्ञात-अज्ञात स्त्रियांचे रोमांचकारी कार्य,त्यांचा जाज्वल्य देशाभिमान ,प्राणांची आहूती देणं या सर्वांचं हुबेहुब चित्र त्यांनी आपल्या नृत्य-नाट्य, गायनातून उभं केलं!! पांढ-याशुभ्र पोशाखावर घेतलेल्या रंगीत ओढण्यांचा प्रसंगानुसार वेगवेगळ्या प्रकारे वापर करून त्यांनी तामिळनाडू, बंगाल,पंजाब,महाराष्ट्रातील अनेक अपराजिता रसिकांसमोर जणूकाही साक्षात उभ्या केल्या.संपदा थिटे यांचे गायन आणि त्यांच्या साथीदारांच्या संगीत-वाद्यांची नेमकी साथ, सुयोग्य प्रकाशयोजना, सकस अभिनय यामुळे या पथनाट्याने एक वेगळीच उंची गाठली.बलसागर भारत होवो हे गीत सुरू झाले आणि उपस्थितांचे बाहू स्फुरण पावले,टाळ्यांच्या अविरत कडकडाटाने प्रेक्षकपसंतीची पावतीच दिली. कलापिनीचे प्रमुख डॉ.अनंत परांजपे यांनी या पथनाट्याचे वर्षभरात शंभर प्रयोग होतील अशी खात्री व्यक्त केली.

या पथनाट्यामध्ये मीनल कुलकर्णी, कामिनी जोशी, सावनी परगी, अनुजा झेंड, तेजस्विनी गांधी, मुक्ता भावसार, सायली रोंधळ यांचा सहभाग होता. संगीत दिग्दर्शन आणि गायन -संपदाताई थिटे, ढोलकी साथ – कौस्तुभ ओक, तालवाद्य साथ -.प्रविण ढवळे, अनिरुद्ध जोशी, गायन साथ – चांदणी पांडे आणि स्वरदा रामतीर्थकर यांनी केली. आपल्या मधुर आवाजात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. माधुरी कुलकर्णी यांनी केले. नटराज प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!