आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

संपूर्ण समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याचे काम कलावंत करत असतो : अभिनेते मिलिंद शिंदे.

जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेला उत्साहात सुरुवात.

Spread the love

संपूर्ण समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याचे काम कलावंत करत असतो : अभिनेते मिलिंद शिंदे.

जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेला उत्साहात सुरुवात.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे, वार्ताहर  २० जानेवारी.

प्रत्येक कलाकाराने आपण समाजाला काय दिले, याचे अवलोकन करण्याची गरज आहे. कारण देशाचे म्हणजेच संपूर्ण समाजाचे सांस्कृतिक आरोग्य जपण्याचे काम कलावंत करत असतो. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ चित्रपटाने माझी वेगळी ओळख निर्माण झाली. केवळ रियाज व वाचनामुळे हे शक्य झाले, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे आयोजित कै. कल्याणराव उर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प अभिनेते मिलिंद शिंदे यांनी गुंफले. यावेळी ते ‘माझा कला प्रवास’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलापिनीचे विश्वस्त अनंत परांजपे होते. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे उपप्रांतपाल विलास काळोखे, ट्रस्टचे संस्थापक डॉ. कृष्णकांत वाढोकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, उपाध्यक्ष माजी नगरसेवक निखिल भगत, डॉ. वर्षा वाढोकर, मिलिंद निकम, विश्वास देशपांडे आदी उपस्थित होते.

मिलिंद शिंदे पुढे बोलताना म्हणाले, की कलाकारांमध्ये खूप सामर्थ्य असते. ज्या नटाला वाटतं की मला अभिनय येतो, माझ्यामुळेच चित्रपट, नाटक यशस्वी झाले. ही भूमिका मी फुलवली, असे म्हणणाऱ्या नटाचा कपाळमोक्ष झालाच म्हणून समजा. कारण नाटक, चित्रपटाला यशस्वी करण्यात संपुर्ण टीम कष्ट घेत असते. नट सहजासहजी घडत नसतो. वादातून, मंथनातून जे निघतं, ते नट म्हणून आपणाला पुढे करते. आज मी जो काही आहे, तो केवळ ग्रंथालयांमुळेच. प्रत्येकाला वाचनाचे वेड असावे लागते. वाचन आणि साहित्यिकांचा सहवासही खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या कक्षा रुंदावत असतात.

नटांना रियाज नसतो, असे म्हणणे चुकीचे आहे. गायक, वादकाप्रमाणे नटांनाही दररोज रियाज आवश्यकच असतो. ज्याच्याकडून शिकता येईल, त्याच्याकडून शिकत जावे. ज्ञान ओरबाडून घेता यायला हवं. पण नख लागता कामा नये. तसेच तुमच्यावर चांगलं बोलणाऱ्यावरही खूप काही अवलंबून असते.

प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी, सूत्रसंचालन मिलिंद निकम यांनी, तर आभार अतुल पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!