देश विदेशमावळसामाजिक

मणिपूर घटनेचा त्रिव्र निषेध काँग्रेस कमिटीतर्फे उद्या तहसीलदारांना निवेदन. ज्येष्ठ काँग्रेस नेते रामदास काकडे .

मणिपूरमध्ये महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहे ते पहता मणिपूर हे राज्य नसून तालिबानी राजवट आहे की काय?

Spread the love

मणिपूर घटनेचा त्रिव्र निषेध काँग्रेस कमिटीतर्फे उद्या तहसीलदारांना निवेदन.. ज्येष्ठ काँग्रेस नेते रामदास काकडे.Strong protest against the Manipur incident, a statement from the Congress Committee to the Tehsildars tomorrow.. Senior Congress leader Ramdas Kakade.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २३ जुलै.

मणिपूरमध्ये महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार सुरू आहे ते पहता मणिपूर हे राज्य नसून तालिबानी राजवट आहे की काय?असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते रामदास काकडे यांनी केले आहे.मणिपूर घटनेचा त्तीव्र निषेध व्हावा यासाठी सोमवार दिनांक २४ जुलै रोजी सकाळी ठीक ११ वाजता मावळ तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर घटनेचा त्रिव्र निषेध करण्यात येणार आहे असे रामदास काकडे यांनी नमूद केले आहे. मावळ काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात येणारे निवेदन तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारावे व मावळातील जनतेचा उद्रेक अहवालाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावा.

मणीपुर मध्ये केंद्र सरकारने शांतता प्रस्थापित करून महिला व विद्यार्थिनींना संरक्षण ,शांतता बहाल करावी अशी मागणी रामदास काकडे यांनी केलेली आहे

काय आहे. मणिपूर प्रकरण.

मणिपूरमध्ये ४ मे रोजी घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ३ मे रोजी मणिपूर मध्ये दोन समुदायांतील हिंसाचाराला सुरुवात झाली, तेव्हापासून अनेक वेळा महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला आहे. आतापर्यंत यामध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.मणिपूर हे ईशान्य भारतातले अतिशय सुपीक, हिरवेगार आणि तीन दशलक्ष लोकसंख्या असलेले एक सुंदर राज्य. मात्र, दोन महिन्यांपासून या राज्यात अभूतपूर्व असा हिंसाचार पेटला आहे. मैतेई व कुकी या दोन समुदायांमध्ये दीर्घ काळ चाललेल्या संघर्षाने टोक गाठले आहे. मणिपूर गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. मध्यंतरी जून महिन्यात एका निवृत्त सैन्य अधिकाऱ्याने ट्वीट करीत म्हटले होते, “मणिपूर राज्य आता राज्य राहिलेले नाही. लिबिया, लेबनान, नायजेरिया, सीरिया या देशांप्रमाणेच मणिपूरमध्ये कोणाचेही जीवन आणि मालमत्ता कधीही नष्ट होऊ शकते.

नुकताच मणिपूरमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्यामध्ये कुकी समुदायाच्या दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढल्याचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी संध्याकाळी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर देशभरातून प्रतिक्रियांचा पाऊस पडला. महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी तत्काळ मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधून या घटनेबद्दलची माहिती घेतली. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या गर्तेत महिला कशा काय भरडल्या जात आहेत याची चिंता देशाला लागलेली आहे.

बुधवारी रात्री (१९ जुलै) सोशल मीडियावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. ही घटना ४ मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली असून, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. १८ मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, या अमानवी गुन्ह्याला दोन महिने उलटूनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.ज्या दोन महिलांवर अत्याचार करून, त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, त्या महिला कुकी-झोमी समुदायाच्या असल्याचे सांगण्यात येते. खांगपोकी या डोंगराळ जिल्ह्यात या समुदायाचे प्राबल्य आहे. दोन महिलांपैकी एकीचे वय २०; तर दुसरीचे वय ४० असल्याचे कळते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ अत्यंत विदारक परिस्थिती विशद करणारा असून, या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पुरुषांचा जमाव या महिलांना बळजबरीने शेतात नेत असताना त्यांच्या शरीराची विटंबना करताना दिसत आहे.
स्क्रोल या संकेतस्थळाने दोन पीडितांपैकी एका महिलेशी संपर्क साधून, त्या दिवशीचा घटनाक्रम जाणून घेतला. संकेतस्थळाशी बोलताना या महिलेने सांगितले की, मैतेई आणि कुकी समुदायामध्ये हिंसाचार उसळल्याच्या दुसऱ्याच दिवशी खांगपोकी जिल्ह्याच्या बी फैनोम या गावानजीक ४ मे रोजी ही घटना घडली. मैतेई समुदायाचा जमाव चाल करून आला असून, तो घरे जाळत असल्याचे ऐकल्यानंतर कुकी समुदायाच्या लोकांनी तिथून पळ काढला. मात्र, दुर्दैवाने या दोन महिला त्यांच्या तावडीत सापडल्या. त्यानंतर जमावाने या महिलांचा विनयभंग करीत त्यांना विवस्त्र केले.
शांतता प्रस्थापित करण्यासाठी मणिपूरमध्ये आंदोलने होत आहेत.

” ‘आम्हाला सोडून द्या’, अशी याचना आम्ही जमावातील लोकांकडे करीत होतो; पण त्यांनी आमचे काहीच ऐकले नाही. तुम्ही निमूटपणे कपडे उतरवले नाहीत, तर तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी आम्हाला देण्यात आली”, अशी माहिती पीडित महिलेने ‘स्क्रोल’शी बोलताना दिली. तसेच पीडितेने पुढे म्हटले की, निर्वस्त्र केल्यानंतर जमावाने तिला काही अंतरावर असलेल्या भातशेतात नेले. तिथे तिला जमिनीवर झोपण्यास सांगितले; पण तिच्यावर बलात्कार झाला नाही, अशी प्रतिक्रिया त्या पीडित महिलेने संकेतस्थळाला दिली.मणिपूर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया सुरू आहे. काही गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे दृष्य अतिशय भयावह आणि चीड आणणारे आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही या प्रकरणावर चीड व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मणिपूर येथे त्या दोन महिलांसोबत घडलेला विकृत प्रकार पाहून हृदय पिळवटून निघाले. या घटनेची जेवढ्या कडक शब्दांत निंदा करू, तेवढी कमीच आहे. समाजात जेव्हा हिंसाचार उसळतो, तेव्हा त्याची सर्वाधिक किंमत महिला आणि मुलांना चुकवावी लागते. मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा आपण सर्वांनी एका आवाजात विरोध केला पाहिजे, तसेच राज्यात लवकर शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करायला हवा. मणिपूरमधील हिंसक घटनांकडे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोळेझाक का करीत आहेत?

टिपरा मोथा या त्रिपुरामधील पक्षाचे माजी प्रमुख प्रद्योत बिक्रम देबबर्मा यांनीही या घटनेचा निषेध केला. दोन महिन्यांपासून एकमेकांविरोधात हिंसाचार करणाऱ्या मैतेई आणि कुकी समुदायामधील नात्यांमध्ये आता पूर्णपणे दरी पडली असल्याचे वर्णन त्यांनी केले. दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ मानवतेला काळिमा फासणारा आणि मन हेलावून टाकणारा आहे. मणिपूरमध्ये द्वेष आणि तिरस्काराचा विजय झाला असून, दोन समाजांतील नातेसंबंध आता पूर्णपणे कोलमडून पडले आहेत.
मणिपूरमध्ये ४ मे रोजीची निषेधार्ह घटना ही काही पहिलीच घटना नाही. त्याआधी आणि नंतरही महिलांना लक्ष्य केले गेले आहे. मागच्या शनिवारी (१५ जुलै) पूर्व इम्फाळ जिल्ह्यातील सावोमबंग परिसरात एका महिलेची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मृत महिलेचा चेहरा विकृत करून तिला मारण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मरिंग नागा समाजातील ५० वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर गोळी झाडण्यात आली होती. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी कारवाई करीत नऊ लोकांना ताब्यात घेतले; ज्यामध्ये पाच महिलांचा समावेश होता.

६ जुलै रोजी इम्फाळच्या पश्चिम जिल्ह्यात एका अज्ञात शस्त्रधारी आरोपीने शाळेबाहेर एका महिलेवर गोळी झाडली. पोलिसांनी सांगितले की, ती काही कामानिमित्त शाळेजवळ जात होती. पण तिचा आणि त्या शाळेचा काही संबंध नव्हता. दोन महिन्यांपूर्वी डोंगराळ भागात वास्तव्य करणारा कुकी हा वांशिक गट आणि मैदानी प्रदेशात राहणारा मैतेई समुदाय यांच्यात हिंसक वाद निर्माण झाला. हिंसाचार उफाळल्यानंतर अनेक भागांत महिलांवर अत्याचार केले गेले.
३ मे रोजी पहिल्यांदा मैतेई आणि कुकी समुदायामध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली. तेव्हापासून राज्यात अस्थिरता असून, सामान्य जनजीवन विस्कळित झाले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १०० लोकांचा बळी गेला असून, ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जवळपास ६० हजार लोकांना हिंसाचारामुळे विस्थापित व्हावे लागले असून, राज्यातील ३५० तात्पुरत्या शिबिरांमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सैन्य, निमलष्करी दल, पोलिस असे एकूण ४० हजार जवान राज्यात तैनात करण्यात आले असून, हिंसाचार थांबविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. हिंसाचार सुरू झाल्यापासून पोलिसांकडील चार हजार शस्त्रे जमावाने पळवून नेली आहेत. त्यापैकी केवळ एक-चतुर्थांश शस्त्रे स्वेच्छेने परत देण्यात आली आहेत, अशी बातमी बीबीसीने दिली आहे.

हिंसाचार रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला आहे.याशिवाय हिंसक जमावाने २०० चर्च आणि १७ मंदिरांचे नुकसान केले आहे. केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि काही आमदारांच्या घरांनाही लक्ष्य करण्यात आले असून, दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. हिंसाचारामुळे ठिकठिकाणी कर्फ्यू लावला असून, शाळा आणि इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचार उसळल्यानंतर राज्याचा दौरा केला आहे. तसेच केंद्र सरकारकडून हिंसाचार थांबविण्याचे प्रयत्न होत असूनही राज्यातील परिस्थिती निवळलेली नाही; उलट दिवसेंदिवस ती चिघळत चालली आहे.

दरम्यान, विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून, भाजपाचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना हटविण्याची मागणी केली आहे. राज्यात भाजपाची सत्ता असून हिंसाचार थांबविण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचे वारंवार सांगितले जात आहे. ‘बीबीसी’शी बोलताना बिनालक्ष्मी नेप्राम या महिला संघटनेने सांगितले की, मणिपूरमध्ये सध्या जे काही चालले आहे, तो सर्वांत वाईट इतिहास म्हणून गणला जाईल. हिंसाचार सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत अनेक घरे आगीत खाक झाली, लोकांना जिवंत जाळण्यात आले, त्यांची हाल हाल करून हत्या करण्यात आली. आधुनिक काळात मणिपूरने या प्रकारचा हिंसाचार आतापर्यंत पाहिला नव्हता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!