राजकीय

खासदार राहुल शेवाळे यांची मित्रमंडळी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार !

Spread the love

मुंबई- दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची साथ सोडली.परंतु शेवाळे हे शिंदे गटात सहभागी झाले असले तरी त्यांचे जवळचे,जिवाभावाचे मित्र म्हणून ओळखले जाणारे शिवसेना विधानसभा समन्वयक निमिष भोसले,अनिल पाटणकर,शेखर चव्हाण आदींसह काही शिवसेना पदाधिकारी मंडळी आणि सामान्य शिवसैनिकही उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहिला आहे.त्यामुळे शेवाळेंच्या शिंदे गटातील प्रवेशानंतरही त्यांच्यासोबत जाण्यास त्यांचे मित्र मात्र तयार नसल्याची चर्चा शिवसेनेत ऐकायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांपाठोपाठ १२ खासदारही गेल्याने या खासदारांच्या गटाचे लोकसभेतील गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांची निवड केली आहे.त्यामुळे शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीतच असलेल्या राहुल शेवाळे यांचे काल शनिवारी मुंबईत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे स्मृतीस्थळ,चैत्यभूमी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन ते चेंबूरमधील आपल्या घरी दाखल झाले. तसेच शेवाळेंनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मातोश्रीवर दक्षिण मध्य मुंबईच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला सर्वच पदाधिकारी उपस्थित राहिले.यावेळी शेवाळेंचे कट्टर समर्थक व मित्र असलेल्या निमिष भोसले, शेखर चव्हाण आदींवर शिवसेनेची करडी नजर होती.परंतु त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढत आम्ही आपल्यासोबतच असल्याची ग्वाही विभागप्रमुख मंगेश सातमकर यांच्यासमोर दिली.राहुल शेवाळे यांचे मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका कामिनी शेवाळे तसेच काही शाखाप्रमुख वगळता कुणीही नेहमीचा शिवसेना पदाधिकारी दिसला नाही. त्यामुळे आता त्यांच्या समर्थक मित्रांसह शिवसेना पदाधिकारी आणि कट्टर शिवसैनिक शिंदे गटात सामील होण्याच्या मनस्थितीत नसल्याचे बोलले जात आहे.सध्या शेवाळे यांचे मित्र समजली जाणारी मंडळी आपल्या विभागात शिवसेनेचे कार्यक्रम राबविण्याचे काम राबविण्यात मग्न असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!