देश विदेश

16 सप्टेंबर…. “जागतिक ओझोन दिवस”

Spread the love

पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ओझोन थराचे संरक्षण करण्याविषयी प्रबोधन व्हावे तसेच चालू असलेल्या सर्वंकष प्रयत्नांची सर्वांना माहिती व्हावी म्हणून आज *16 सप्टेंबर* हा दिवस *”जागतिक ओझोन दिवस…*International Ozone Day”* म्हणून पूर्ण जगभर दरवर्षी साजरा केला जातो. आज ह्या दिनाचे औचित्य साधत मी सर्वांना या ओझोन विषयी शास्त्रीय माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.

ओझोन हा वायू मुळात प्राणवायुचा संयुग आहे. ओझोन हा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन पासून बनलेला असून त्याचे रेणुसूत्र O३ (ओ थ्री) असे आहे. सामान्य ऑक्सिजन मध्ये दोन अणू O२ (ओ टू) असतात. वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण फक्त 0.00006 टक्के असते. सूर्याची अतिनील किरणे वातावरणातून पृथ्वीवर येताना जमिनीपासून 60 ते 80 किलो मीटर उंचीच्या पट्ट्यात त्यांचा ऑक्सीजनशी रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोन वायू तयार होतो. ओझोन वायूचा थर पृथ्वीच्या सभोवती असून पृथ्वीपासूनचे अंतर 16 ते 23 किलोमीटरच्या पट्ट्यात आहे. ओझोन थर पृथ्वीवरील सर्व सजीवसाठी एक वरदान आहे कारण सूर्यापासून पृथ्वीवर येणाऱ्या अतिनील किरणांपासून सर्वांचा बचाव करतो. ओझोन वायू हा निळा रंगाचा असून त्याची घनता 2.14 मिलिग्रॅम प्रतिघनसेमी एवढी आहे. हा पाण्यात किंचित विरघळतो. ओझोन वायूचा शोध सर्वात प्रथम 1840 मध्ये स्कॉनबिन या शास्त्रज्ञाने लावला. 1872 साली बी. ब्रॉडी यांनी ऑक्सिजनचे तीन अणू एकत्र येऊन ओझोनचा रेणू बनलेला असतो हे पहिल्यांदा शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध केले. 1930 मध्ये भौतिक शास्त्रज्ञ सिडनी चॅपमन यांनी ओझोनचा थर कसा तयार होतो याची प्रक्रिया शोधून काढली आणि 1973 मध्ये फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ चार्ल्स फॅब्री आणि हँनरी बुईसन यांनी सर्वप्रथम ओझोनचे थरांचा शोध लावला.

खरं म्हणजे ओझोन या शब्दाचा पहिला संबंध शाळेत असताना सरांनी विज्ञानच्या तासाला पृथ्वीच्या संरक्षक कवचाला पडलेल्या भगदाडाचे वर्णन केले होते तेव्हा आला होता. सजीवांच्या नाश करणाऱ्या सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा पृथ्वीवर सहज होणाऱ्या प्रवेशाला प्रतिबंध करणारे सर्वात मोठे अस्त्र म्हणजेच ओझोन हे त्यावेळी कळले होते. सूर्य आणि पृथ्वी यामधील ओझोनच्या थरामुळे सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांचा काही भाग शोषला जातो. सजीवांना पोषक व सहन करता येईल एवढीच उष्णता भूपृष्ठावर येते त्यामुळे अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचे संरक्षण होते. जर ओझोनचा थर नसता तर अतिनील किरणे जशीच्या तशी पृथ्वीवर पोहोचली असती आणि मानवासह सर्व सजीवांना भयंकर परिणाम भोगावे लागले असते. या किरणामुळे गंभीर त्वचा व नेत्र रोग जडू शकतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर 1970 मध्येच ओझोनचे विघटन करणाऱ्या वायूमुळे पृथ्वीच्या संरक्षण कवचाला मोठे भोक पडले आहे असे कळले होते. 1980 नंतर एका सर्व्हे मोहिमेत अंटार्क्टिका येथे परीक्षण सुरू होते तेंव्हा सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर या हिवाळ्याच्या महिन्यानंतर म्हणजे वसंत ऋतूत ओझोनच्या थरामध्ये 1957 सालापासून कधीही नव्हते इतके घट झाल्याचे आढळले. त्याची सर्व परीक्षणे संशोधकांनी 1985 साली ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकेत प्रकाशित केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय परिषदांमध्ये सातत्याने या विषयाचा अभ्यास आणि चर्चासत्र सुरू झाले. ओझोनच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 22 मार्च 1985 रोजी “व्हिएन्ना करार” झाला. 1987 झाली मॉन्ट्रियल प्रोटोकॉल प्रसिद्ध झाला. त्यावेळी ओझोन वायूच्या विघटनासाठी जबाबदार असणाऱ्या जवळ जवळ सर्वच रसायनावर विविध प्रयोगाअंती शिक्कामोर्तब झाले. क्लोरोफ्लुरोकार्बन (CFC’s) हा वायू जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्याच्या पर्यायांचा विचार करून शतकातील जागतिक तापमान वाढ 0.4 सेल्सिअस इतकी कमी करणे हे उद्दिष्ट्य ठरवले गेले. 19 डिसेंबर 1994 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने केलेल्या ठरावानुसार 16 सप्टेंबर हा दिवस ओझोनच्या थराचे संरक्षण करणारा जागतिक ओझोन दिवस म्हणून 1995 मध्ये प्रथम सर्वत्र पाळला गेला.

एका संशोधनानुसार ओझोन वायूचे दोन प्रकार पडलेले आहेत. 1) good ozone आणि 2) bad ozone.

निरीक्षण करताना असे आढळले की पृथ्वीच्या जमिनीलगतच्या वातावरणात देखील ओझोनचा वावर सापडला. परंतु या ओझोनची निर्मिती पृथ्वीवरील प्रदूषित वायूंच्या प्रक्रियेतून झाली होती. नायट्रोजन ऑक्साईड आणि सेंद्रिय रसायने यांच्या प्रक्रियेतून तसेच वाहनाच्या व उद्योग कारखान्यांच्या धुराड्यातून या ओझोनची निर्मिती होते. या ओझोन वायूमुळे छातीत वेदना होणे, श्वसनास त्रास होणे. घशाची जळजळ होणे, मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला, दमा इत्यादी विकार होऊ शकतात. म्हणून याला bad ozone असे नामकरण करण्यात आले. म्हणून गुड ओझोनच्या संरक्षणासाठी जगभरातील देशांनी आजवर केलेल्या प्रयत्नातून CFC निर्मूलन कमी-अधिक प्रमाणात शक्य झाले आहे. परंतु यामुळे अर्थव्यवस्था ताणली जाते म्हणून काही विकसित देश ही आपल्या मर्यादा पाळण्यात अपयशी ठरले आहेत. 2010 साली CFC चे उत्पादन थांबण्याची शेवटचे वर्ष होते. तसेच CFC ला पर्याय म्हणून शोधलेल्या HCFC व HFC या वायूंची निर्मिती करणाऱ्या साधनांचा उपयोग 2030 पर्यंत थांबवायचा आहे. जागतिक पातळीवर त्या बाबतीत प्रयत्न ही सुरू आहेत. त्याला कितपत यश येते हे काही वर्षातच समजून येईल.

ग्रीन हाऊस मुळे मिथेन, नायट्रस ऑक्साईड व बाष्प हे वायू वातावरणात सोडले जातात. त्याचे वातावरणातील प्रमाण संतुलित असेपर्यंतच त्याची पृथ्वीवरील सजीवाना मदत होते. या वायूंचे वातावरणातील वापराचे प्रमाण भरमसाठ वाढल्यास याचे खूपच तोटे होऊन एकंदरीत सजीव जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतात. तसेच refrigerator मधून बाहेर पडणाऱ्या वायू, कृत्रिम खते यातील फवारा मारल्यानंतर त्यातील रसायनामधील वायूंच्या दाट थरामुळे वातावरणातील सूर्याची किरणे परावर्तित होऊन परत अंतराळात जात नाहीत. त्यामुळे वैश्विक तापमान वाढ प्रचंड होत असते. ही तापमान वाढ निसर्गाचा किंवा पृथ्वीचा मूळ स्वभाव बदललण्यास कारणीभूत ठरत असते. ह्या परिणामास “असंतुलित हरितगृह परिणाम” असे म्हणतात. या हरितगृह वायूमुळे सुद्धा आपल्या पृथ्वीवरचे ओझोनचे आवरण विरळ व पातळ होत चालले आहे. हे खूप गंभीर आहे. त्यामुळे ओझोनचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हरितगृह परिणाम नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. वातावरणातील ओझोनच्या रसायनशास्त्र विषयक संशोधनासाठी डच संशोधक पॉल क्रुत्झेन तसेच अमेरिकन संशोधक मारिओ मोलीना आणि शेरवुड रोलंड यांना 1995 सालच्या नोबेल पारितोषक देवून गौरविण्यात आले.

संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक हवामान विज्ञान संस्थेने काही वैश्विक विज्ञान संस्थांच्या सहयोगाने तयार केलेल्या एका नव्या अहवाल प्रमाणे जागतिक तापमान वाढ हा विषय जगाच्या चिंतेचा बनलेला आहे. ओझोनचे प्रमाण जर व्यवस्थित मेन्टेन झाले नाही तर पुढील पाच वर्षांत जगाच्या तापमानात तब्बल 1.5 अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. 2015 मध्ये झालेल्या पॅरिस करारानुसार ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करावे लागेल. अशा प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन कमी करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी योग्य प्रयत्न झाले तरच औद्योगिकरणच्या आधी जेव्हढे जगाचे तापमान होते त्या तुलनेत किमान दोन अंश सेल्सिअस पेक्षा कमी ठेवता येवू शकेल.

शेवटी मानवाला समृध्द आणि सुरक्षित जीवनासाठी प्रगतीची आणि विकासाची कास धरावीच लागेल पण त्याचबरोबर आपल्या जीवनशैलीत पर्यावरण संवर्धन व निसर्गानुकूल बदल निश्चितच करावे लागतील हेच आजचा *जागतिक ओझोन दिवस* प्रबोधनात्मकरित्या साजरा करण्यामागचा आणि त्या संबंधी निश्चित अशी सकारात्मक कृती करण्याची आठवण करून देण्याचा महत्वाचा हेतू, उद्दिष्ट आहे असेच म्हणावे लागेल…. कारण ओझोन थराला भगदाड पडण्याची सुरुवात झालेल्या दक्षिण ध्रुवावर म्हणजे अंटार्टिका वर सततच्या प्रयत्नांमुळे ते छिद्र जवळपास शून्य झाले होते ते काही महिन्यांपूर्वी तब्बल 24 दशलक्ष चौरस किलोमीटर एव्हढे प्रचंड वाढले होते….सर्वांनीच याचा विचार करावा लागेल…..

*✒️…* लेखन/संकलन-
*प्रशांत शरद पुजारी, गारगोटी*
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, कोल्हापूर जिल्हा, उपाध्यक्ष, भुदरगड तालुका पर्यावरण संवर्धन व संरक्षण संस्था.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!