सामाजिक

मनपा गोवंश व मोठ्या पशुधनासाठी कोंडवाडा कधी उभारणार – कुणाल साठे

Spread the love

प्रतिनिधी श्रावणी कामत

पिंपरी (दि. 3 मार्च २०२४) तीन वर्षांपूर्वी शहरातील भटक्या व मोठ्या जनावरांसाठी टाळगाव चिखली येथे कोंडवाडा (गोठा) प्रकल्प उभारण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मंजुरी दिली होती. यासाठी शहरातील विविध संघटनांनी अनेक वेळा आंदोलने करून प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. २०२२ मध्ये विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांच्या वतीने महानगरपालिका भवन परिसरामध्ये भटकी जनावरे सोडून आंदोलन केले होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. परंतु अद्यापही हा प्रश्न प्रलंबित आहे. पिंपळे सौंदागर येथे श्वान फिरवण्यास आणण्यासाठी उद्यान विकसित करण्यात आले आहे. याचा आनंदच आहे. यासाठी तत्परता दाखवणारे प्रशासन अनेक वर्षापासून रस्त्यावर फिरत असलेल्या गोवंश साठी कोंडवाडा (गोठा) उभारण्यास का दिरंगाई करीत आहे ? असा प्रश्न विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे सह संयोजक कुणाल साठे यांनी उपस्थित केला आहे.

सकल हिंदू समाज पुणे जिल्हा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संस्थांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात साठे यांनी पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात भटक्या जनावरांचा गंभीर प्रश्न आहे. गोवंशाची तस्करी, चोरी असे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी भोसरी, मोशी परिसरात गोवंशला भूलीचे इंजेक्शन देऊन तस्करी, चोरी करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा भटक्या जनावरांमुळे अनेक ठिकाणी अपघात घडले आहेत. याबाबत वेळोवेळी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने करून प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महानगरपालिकेत प्रशासकिय राजवट सुरू होण्याअगोदर २०२२ मध्ये कार्यकर्त्यांनी मनपा भवन परिसरामध्ये भटकी जनावरे आणून सोडून आंदोलन केले होते. त्यावेळी देखील हा प्रकल्प लवकर मार्गी लावू असे आश्वासन प्रशासनाने शिष्टमंडळास दिले होते. २०१२ पासून भटक्या गोवंशासाठी आणि मोठ्या जनावरांसाठी असा प्रकल्प उभारला जावा ही मागणी होती. तीन वर्षांपूर्वी चिखली येथे प्रकल्प उभारण्यास मंजुरी देखील मिळाली. श्वानांसाठी स्मशानभूमी व पार्क विकसित करणारे प्रशासन, दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ३५० कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या कामांना मंजूरी देणारे प्रशासक तथा मनपा आयुक्त शेखर सिंह हे गोवंश व मोठी भटकी, जखमी जनावरे यांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी कोंडवाडा (गोठा) उभारण्यासाठी २०२३ मध्ये मंजुरी देण्यात आलेल्या प्रकल्पास का चालना देत नाहीत ? असा उद्विग्न सवाल सकल हिंदू समाज पुणे जिल्हा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचारला आहे. याचे उत्तर प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह देतील काय ?

पिंपरी चिंचवड हे वेगाने विकसित होणारे शहर आहे. स्मार्ट सिटी, स्वच्छ सिटी, मेट्रोसिटी म्हणून शहराचा नावलौकिक वाढत आहे. नागरिकांची मागणी नसताना अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देऊन पत्रकार परिषद घेऊन प्रसिद्धी मिळविण्याचा हव्यास असणारे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन ती पत्रकार परिषदेत जाहीर करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!