मावळ

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून योग साधकांची योगसाधना

यशवंत को. ऑ. हाऊस मॅनेजमेंट सोसायटी तळेगाव येथे दिनांक ११ ते १७ मार्च या कालावधीत सात दिवसीय महिलांसाठी मोफत योग शिबिर संपन्न

Spread the love

तळेगाव दाभाडे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून यशवंत को. ऑ. हाऊस मॅनेजमेंट सोसायटी तळेगाव येथे दिनांक ११ ते १७ मार्च या कालावधीत सात दिवसीय महिलांसाठी मोफत योग शिबिर संपन्न झाले. या योग शिबिरात तळेगाव शहरातील जेष्ठ नागरिक महिलांसह ५० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत उस्फुर्त प्रतिसाद दिला.


११ मार्च रोजी शिबिराचे उद्घाटन शशिकला कारके, अर्चना काटे आणि योगशिक्षक संगीता शिंदे यांच्या हस्ते झाले. योग शिबिर सप्ताहादरम्यान सहभागी महिलांची संख्या रोजच वाढत गेली. सहभागी महिलांना जीवनातील योगा चे महत्व समजावून, शरीर आणि मन यांची एकमेकांशी सांगड कशी घालावी, त्यांना एकत्र कसे आणावे, कसे जोडले जावे या विषयी योग प्रशिक्षिका संगीता शिंदे यांनी मार्गदर्शन केले. दररोज योग केल्याने शरीराला आणि मनाला लागणारी शिस्त, योगातील सातत्याचे महत्त्व महिलांना पटवून दिले.


या शिबिरा दरम्यान ओंकार साधना, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक दाखवून; सर्व महिलांकडून ते करून घेतले. तसेच प्रत्येक योगासनाचे फायदे देखील समजावून सांगितले. एखादे आसन कोणी करावे व कोणी करू नये ,याचे मार्गदर्शन योग शिक्षकांनी केले. योगशास्त्र, आहारशास्त्र यांचे महत्त्व पटवून दिले. योगासह पौष्टिक व सकस आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे हे स्त्रियांना उदाहरणासह समजावून सांगितले. मधुमेह ,थायरॉईड यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ; योग्य अन्नपचन होण्यासाठी, शरीरातील मेद (चरबी) कमी होण्यासाठी कोणती योगासने घालावी हे सांगितले. योग विषयक सामान्य ज्ञान म्हणजे योग करताना पोशाख कसा असावा, योग करण्याची जागा कशी असावी, योग करण्याची योग्य वेळ कोणती असावी, याचे देखील मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. योगची ‘आठ अंगे’ म्हणजेच ओमकार उच्चारण , प्रार्थना, सूक्ष्म हालचाली, सूर्यनमस्कार, योगासने, शवासन, प्राणायाम आणि शांती पाठ हे अनुक्रमाने का करावे; हे देखील अतिशय सुंदररीत्या स्पष्ट केले. या शिबिरादरम्यान रांगण्याचे, पोहण्याचे विविध व्यायाम प्रकार महिलांकडून खेळीमेळीच्या वातावरणात करून घेतले. त्यामुळे शिबिरांमध्ये बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. योग मधून आपल्या शरीराला मनशांती कशी मिळवता येईल, धावपळीच्या जीवनात येणारा ताणतणाव आपण योगमार्फत कसा दूर करू शकतो, या विषयी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळी नियमित यावी, PCOD आणि PCOS या विषयक समस्या दूर करण्यासाठी विविध योगासने सांगितली. Menopause दरम्यान होणारा मानसिक चढ-उतार आणि त्यावर समतोल कसा साधावा, याचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरा दरम्यान सर्व महिलांचे वजन, रक्तदाब, रक्तातील साखर या तपासण्या करण्यात आल्या. शरीरात सकारात्मक ऊर्जा कशी निर्माण करावी आणि आयुष्य हे आनंदी, निरोगी, तेजस्वी, सकारात्मक कसे जगावे याचे मार्गदर्शन केले.
शेवटच्या दिवशी महिलांनी या शिबिराचा अतिशय सुंदर शब्दात अभिप्राय सुद्धा दिला. थोडक्यात या सात दिवसात योग्य शिक्षकांनी ‘योग चे सौंदर्य’ सर्वांना पटवून दिले.

या योग सप्ताहाची सांगता करताना योगशिक्षिका संगीता शिंदे यांनी सर्व महिलांना सूर्यनमस्काराविषयी मार्गदर्शन करणारे पुस्तक भेट दिले .या योग शिबिरासाठी मोलाचे सहकार्य करणारे कृष्णा कारके, शशिकला कारके, अर्चना काटे आणि वैशंपायन मॅडम यांचे शाल, श्रीफळ, गुलाबाचे रोपटे देऊन आभार मानण्यात आले. तसेच या योग शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व योगसाधकांचे संगीता यांनी आभार मानले व शांतीपाठाने या योग शिबिराची सांगता करण्यात आली.


योगशिक्षक: संगीता शिंदे ,तळेगाव दाभाडे. प्राणायाम मेडिटेशन वेटलॉस यांचे प्रशिक्षण झाले आहे. योगशिक्षक प्रशिक्षण डिप्लोमा Diploma वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन पदविका डिप्लोमा Diploma. पाच वर्ष ऑनलाईन योग क्लास घेत आहे. मो.नं.9822387096.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!