देश विदेश

डॉ.बळवंत केशव काळे : एक चतुरस्त्र संख्याशास्त्रज्ञ

Spread the love

पुणे विद्यापीठाचे माजी संख्याशास्त्र विभागप्रमुख आणि १९९९ पासून संख्याशास्त्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांचा गौरव करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या संख्याशास्त्र आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सुरु केलेल्या डॉ.पी.व्ही.सुखात्मे पुरस्काराचे २००३-०४ चे मानकरी चतुरस्त्र संख्याशास्त्रज्ञ डॉ. बळवंत केशव काळे यांचे नुकतेच (१४ मार्च) वयाच्या ८९ व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. त्यांनी केलेले संख्याशास्त्रीय कार्य संख्याशास्त्रीय जगताला आणि महाराष्ट्राला भूषणावह वाटावे, असेच आहे. यानिमित्ताने तरुणाईला त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न.

आजवर अनेक महान हस्ती होऊन गेल्या. तथापि, बहुतेकदा त्या क्षेत्रातील लोकांनाचत्यांच्या कार्याची महानता जाणवते. इतरांपर्यंत ती फारशी पोह्चतही नाही. कधी कधी तर आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या दिग्गजांचीही आपल्याला माहिती नसते. अशीच एक हस्ती म्हणजे चतुरस्त्र संख्याशास्त्रज्ञ, डॉ.बळवंत केशव काळे. मुंबई विद्यापीठातून गणितातील पदव्युत्तर पदवी पहिल्या वर्गामध्ये मिळविल्यानंतर डॉ. काळे ज्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये विद्यार्थी व पुढे व्याख्याता होते, तेथील व्यासंगी प्राध्यापकांच्या प्रभावामुळे त्यांना गणितात संशोधन करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. जोडीला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये चर्चासत्र भरवणारे स्वतः आधुनिक बीजगणित, लॅबेग इंटीग्रल अशा नव्या विषयावर व्याख्याने देणारे आणि विशेष म्हणजे होतकरू तरुणांना गणितात संशोधन करण्यासाठी, प्रसंगी परदेशी जाण्यास उत्तेजन देणारे प्रा. पेसी मसानी हे जबरदस्त व्यक्तिमत्व होते. शिवाय प्रा. गुंजीकर, प्रा. वाघ अध्वर्यू असलेले ‘मॅथेमॅटिक्स कलोक्वीयम’ ही होते. सभोवतालच्या संशोधकीय वातावरणामुळे ही डॉ. काळे यांची संशोधन जिज्ञासा अर्थातच वाढली. तथापि, मुंबईत काय किंवा थेट अलिगढ ला जायची तयारी ठेवून असणारे डॉ. काळे यांचे गणिती संशोधनाचे इप्सित साध्य होऊ शकले नाही.
त्यानंतर गणिती संशोधनाबाबत निराश झालेल्या, डॉ. काळे यांना बी.ए., एम.ए. च्या गुणवत्ते बरोबरच त्या दोन्ही परीक्षेतल्या संख्याशास्त्र या ऐच्छिक विषयाच्या बळावर डॉ. हुजुरबाजार यांनी पुणे विद्यापीठात संख्याशास्त्र संशोधनासाठी च्या केंद्रशासनाच्या अभ्यास शिष्यवृत्तीचा देकार दिला. तो स्वीकारून काळे यांनी संख्याशास्त्रीय संशोधनाकडे आपला मोर्चां वळवला. मात्र आजची डॉ. काळे यांची सफल संख्याशास्त्रीय कर्तबगारी पाहिल्यावर ‘होतं ते बऱ्यासाठीच’, असं म्हणता येईल. केंब्रिज च्या मुशीतून बाहेर पडलेल्या डॉ. हुजुरबाजार यांनी त्यांना स्वतः प्रबंध विषय न सुचवता तो गणित व संख्याशास्त्र शोध पत्रिका वरून निवडण्यास सांगितले. तसेच ‘तुम्हाला जर काही महत्त्वाचे सांगायचे असेल तरच माझ्याशी येऊन बोला’ असे आपले केंब्रिज चे परिनिरीक्षक प्राध्यापक जेफरीज म्हणत असत, असे सांगून डॉ. हुजूरबाजारांनी ‘किरकोळ कारणासाठी वेळ घेऊ नये’ अशी अप्रत्यक्ष तंबी दिली. या सूचने मागचा गर्भितार्थ लक्षात घेऊन डॉ.काळे यांनी अडीच वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर ‘संभव समीकरणाची उकल आणि संख्याशास्त्रीय आकलन फलां’ वरील आपला पीएच. डी. चा प्रबंध पूर्ण केला (१९६२).
पीएच. डी. प्राप्त केल्यानंतर ते मुंबई विद्यापीठामध्ये दोन वर्षे, अमेरिकेतील एम्स येथील आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये तीन वर्षे आणि कॅनडामध्ये विनिपेगला मेनिटोबा विद्यापीठामध्ये नऊ वर्षे कार्यरत राहिले. दरम्यान आयोवात विमानतळावर स्वागताला सपत्नीक येण्यापासून ते बाजारहाटास मदत करणाऱ्या प्राध्यापक बँनक्रेफ्ट या संख्याशास्त्रज्ञ व्यक्तीच्या अनौपचारिक वागणुकीचा डॉ. काळे यांच्या मनावर खोल ठसा उमटला. तसेच त्यांच्या सखोल ज्ञानाचा प्रभाव म्हणून डॉ. काळे यांची संख्याशास्त्रा कडे पाहण्याची दृष्टी प्रगल्भ झाली. यानंतर ते १९७६ साली पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून स्थिर झाले. या सर्व शैक्षणिक संस्थातून विशेषतः पुणे विद्यापीठातील त्यांच्या कौशल्यपूर्ण अध्यापन बद्दल त्यांचे माजी विद्यार्थी सांगतात की प्रत्येक व्याख्यानाला वर्गात येताना ते कसून तयारी करून, टिपणे काढून व जरूर ते संदर्भसाहित्य घेऊन मगच येत व आल्यावर नवनवीन संख्याशास्त्रीय संकल्पना उदाहरणासहीत स्पष्ट करण्यात रंगून जात असत. बऱ्याच वर्षाच्या अनुभवी भांडवलावर तयारी शिवाय व्याख्यानास उभे राहणे त्यांना भूषणावह वाटत नसे. वर्गात शिकविताना ते वेळोवेळी जी व्यावहारिक उदाहरणे देत त्यावरून अमूर्त कल्पनांच्या जंजाळात गुंतून न पडता पुढे कुठे तरी या ज्ञानाचा उपयोग होणार, याचा विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण होत असे. चर्चासत्रात नवख्या विद्यार्थ्याला नाउमेद न करता त्याला हुरूप येईल असे त्याच्या कलाकलाने प्रश्न विचारून त्याची गाडी रूळावर आणून अखेर त्याच्या तोंडून इच्छित उत्तर काढण्याचे कौशल्य त्यांच्यापाशी होते, असे म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. डॉ. काळे यांनी प्रामुख्याने पैरामॅट्रिक अँड नॉनपैरामॅट्रिक इन्फरन्स, रिलायबलिटी अँड लाईफ टेस्टिंग, हैडलींग ऑफ डेटा अँड स्टॅटिस्टिकल फंक्शन्स या विषयात संशोधन केले असून त्यांच्या संशोधन कार्याचे स्वरूप हे सैद्धान्तिक प्रश्नांच्या स्पष्टीकरणाच्या जोडीने अत्यंत महत्त्वाचे पद्धती शास्त्रीय योगदान मानले जाते. पुणे येथील मॉडर्न कॉलेजचे माजी उपप्राचार्य आणि संख्याशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी.जी. दीक्षित यांनी डॉ. काळे सरांचा विद्यार्थीदशेत असताना खूप आधार वाटत असल्याचे सांगून मॉडर्न कॉलेजमध्ये अनेक वेळा सेमिनारसाठी डॉ. काळे यांना निमंत्रित केल्याचेही सांगितले. मॉडर्नमधील संख्याशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.एस्सी.) यथायोग्य सुरु ठेवण्यात डॉ. काळे यांचे मौलिक सहकार्य तसेच मार्गदर्शन मिळाल्याचे स्पष्ट करून डॉ. काळे यांनी मॉडर्नच्या ग्रंथालयासाठी त्यांच्याकडील दुर्मिळ पुस्तकेही दिल्याचे डॉ.दीक्षित यांनी याप्रसंगी सांगितले. संख्याशास्त्राच्या एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला विनम्र आदरांजली !! (संदर्भ : सं. पां. देशपांडे यांचे आधुनिक भारतीय गणिती)
*प्रा. विजय कोष्टी, सहयोगी प्राध्यापक, संख्याशास्त्र विभाग पी.व्ही.पी. कॉलेज कवठेमहांकाळ (जि.सांगली), ९४२३८२९११७*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!