देश विदेश

इतिहास घडविणाऱ्या शिवछत्रपतींचा देदीप्यमान इतिहास! – प्रा राजेंद्र काळे

Spread the love

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्राला लाभला असून त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे जतन, संवर्धन आणि विकास करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

आज १९ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत आहे. रयतेचा राजा, जाणता राजा, आपला राजाच नाही तर माझा राजा म्हणून आपण सर्वजन त्यांचे नाव अगदी अभिमानाने घेतो. स्वराज्याच्या शत्रूंना गनिमी काव्याने सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि खिंडीत गाठून यमसदनी पाठवले. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर वापर करून फक्त इतिहासच घडविला नाही तर आपल्या कर्तृत्वाने आदर्श निर्माण केला. यवनी अत्याचाराच्या विळख्यात सापडलेल्या आणि काळ्याकुट्ट अंधारात आपले अस्तित्व चाचपडणाऱ्या मराठी माणसाला या संकटातून बाहेर काढून जगण्याची प्रेरणा देण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
बालपणी राजमाता जिजाऊंच्या कुशीत वाढत असतानाच धर्म, संस्कार आणि राजनीतीचे बाळकडू महाराजांना मिळाले. मोगली राजवटीच्या टाचेखाली भरडला जाणारा महाराष्ट्र, दिवसाढवळ्या स्त्रियांवर होणारे अत्याचार, सामान्य जनतेची होणारी लूट आणि धर्मावर होणारे आक्रमण महाराजांनी मोडीत काढत रयतेचे स्वराज्य निर्माण केले. स्वराज्याची उभारणी करत असताना त्यात सर्व जातीधर्माच्या माणसांचा त्यांच्या कुवतीनुसार उपयोग करून घेऊन स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवली.
जनतेचे राज्य निर्माण करत करताना सर्वाना समान न्याय दिला. दुष्काळात शेतकऱ्यांचा महसूल माफ केला. पडीक जमिनी शेतकऱ्यांना कसून लागवडीखाली आणण्यासाठी दिल्या. शेतीसाठी कर्जे तसेच बी-बियाणे उपलब्ध करून दिले. सिंचनाची सोय उपलब्ध करून देऊन जमिनी ओलिताखाली आणल्या. शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमी भाव दिला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही अशी सैनिकांना सूचना होती. म्हणूनच शिवकाळात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झालेली इतिहासात नोंद आढळत नाही.
स्त्रियांना शिवाजी महाराजांनी सन्मानाची वागणून दिली. न्यायदान करीत असताना एका स्त्री वर अत्याचार केला म्हणून रांझे गावच्या पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंग करताना त्याच्या प्रतिष्ठेपेक्षा न्यायाला प्राधान्य दिले. शत्रूच्या स्त्रिया जर मराठा सैन्याचा तावडीत सापडल्या तर शत्रूची त्यांच्या बाबतीत अगदी निश्चिंत राहायचा इतके स्त्री दाक्षिण्य महाराजांकडे होते. पर स्त्रीला त्यांनी आपल्या आई –बहिणी प्रमाणे मानले. शत्रू स्त्रियांनाही सन्मानाची वागणून देण्याची शिस्त सैन्यामध्ये लावली होती. सैनिकांसाठी कडक नियम होते आणि पालन न केल्यास कठोर शिक्षा दिल्या जात होत्या.
स्वराज्य निर्माण करताना एक एक हिरा त्यांनी पारखून घेतला होता. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, संभाजी कावजी, शिवा काशीद, जीवा महाला, येसाजी कंक अशी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी जीवाला जीव देणारी माणसांची फौज महाराजांनी उभारली होती. शूर मावळयांच्या पराक्रमाने स्वराज्याचा विस्तार चोहोबाजूने झालेला दिसून येतो. मदारी मेहतर, दौलतखान, इब्राहीमखान यांच्यासारखे मुस्लीम सेवक स्वराज्यामध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत होते. स्वराज्याचे प्रशासन चालवण्यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली.
स्वराज्यावर आलेली अनेक संकटे त्यांनी यशस्वीपणे परतवून लावले. अफझलखानासारखा महाकाय राक्षस स्वराज्यावर चालून आला असता मुस्तद्देगिरीने त्यास यमसदनी पाठवले. सिद्दी जोहरच्या वेढ्यातून पन्हाळ्यावरून सुखरूप निसटले परंतु त्यासाठी बाजीप्रभूला घोडखिंडीत आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. स्वराज्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून सुरतेची लूट करून महाराजांनी औरंगजेब इज्जत पार धुळीस मिळवली. पुण्यातील लाल महालावर छापा टाकून शाहिस्तेखानाची बोटे तोडून त्याला कात्रजचा घाट दाखवला. आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेतून त्याच्या हातावर तुरी देऊन महाराज पसार झाले. पुरंदरचा किल्ला लढवताना मुरारबाजीला आणि कोंढाणा घेताना तानाजी मालुसरे या शूर योद्ध्यांना धारातीर्थी पडावे लागले. प्रतापराव गुजर सारख्या स्वराज्याच्या सेनापतींनी अवघ्या सहा मावळ्यांसह नेसरीच्या खिंडीजवळ बहलोल खानाशी झुंज दिली. एकंदरीत स्वराज्याची उभारणी ही अशा शूर वीरांच्या बलिदानावर निर्माण झालेली दिसून येते. ६ जून १६७४ रोजी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि महाराज छत्रपती झाले. स्वराज्याला राजा मिळाला. मराठी माणसांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न साकार झाले होते आणि हे स्वप्न साकार करण्यामागे प्रेरणा होती ती म्हणजे राजमाता जिजाऊंची.
जनतेला हवे असणारे स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केले. लोककल्याणकारी योजना राबवल्या आणि जनतेचं भलं केलं. १६३० ते १६८० या पन्नास वर्षांच्या कालावधीत क्षणाचीही उसंत न घेता अखंड संघर्ष करीत हे स्वराज्य निर्माण केले. धर्मावर आलेले संकट दूर करून महाराष्ट्र धर्म वाढीस लावला. या महाराष्ट्र धर्माचे समीकरण इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांनी पुढीलप्रमाणे मांडले आहे. हिंदू धर्म + धर्मस्थापना + गोब्राम्हणप्रतिपालन = स्वराज्यस्थापना + एकीकरण + धुरीकरण = महाराष्ट्र धर्म
छत्रपती शिवाजी महाराजांची शत्रूवरती जरब होती म्हणूनच इंग्रजांनी महाराज असेपर्यंत स्वराज्यावर आपली वाईट नजर टाकली नाही. कास्मो – द – ग्वार्द या पोर्तुगीज इतिहासकाराने vida de célèbre sevagy (Life of Celebrated Shivaji) हे शिवचरित्र लिहिले असून त्यात तो लिहितो कि,शिवाजी राजाच्या नावाचा दरारा इतका आहे की, कोणीही त्याला आव्हान देण्याचे क्वचितच धाडस करतो.” अशा प्रकारे परकीय इतिहासकारांनीही नोंद घ्यावी असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्राला लाभला असून त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे जतन, संवर्धन आणि विकास करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.

– लेखक इतिहासाचे अभ्यासक असून श्री साईबाबा महाविद्यालय, शिर्डी येथे इतिहास विभागात सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.

संकलन – तुषार महाजन. पत्रकार शिर्डी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!