देश विदेश

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबत सूचना!

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी तारीख १२

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिनांक १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरु राहणाऱ्या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम विविध पातळीवर आयोजित करणे अपेक्षित आहे. राज्यातही या उपक्रमांतर्गत विविध पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन सुरु आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत उपर्निर्दिष्ट क्र. १ अन्वये दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” चे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत राज्यस्तर / जिल्हास्तर / तालुकास्तर व ग्रामस्तरावर आयोजित करावयाच्या कार्यक्रम / उपक्रम यांचे स्वरुप निश्चित केले आहे.
“स्वराज्य महोत्सव” अंतर्गत “समूह राष्ट्रगीत गायन” हा उपक्रम आता दिनांक १७ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता राबवण्यात येणार आहे.

“स्वराज्य महोत्सव” अंतर्गत “समुह राष्ट्रगीत गायन” या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
१. दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता एकाच वेळी राज्यात सर्वत्र समूह राष्ट्रगीत गायन होईल, याची दक्षता घेण्यात यावी.

२. या राष्ट्रगीत गायनासाठी राज्यातील खाजगी, शासकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या शाळा/ महाविद्यालये / शैक्षणिक संस्था / विद्यापीठे यामधील विद्यार्थी, शिक्षक यांचा सहभाग अनिवार्य असेल.

३. सकाळी ठीक ११:०० वाजता समूह राष्ट्रगीताला सुरुवात होईल व सकाळी ११:०० ते ११:०१ या एका मिनिटांमध्ये राष्ट्रगीत गायन करणे अपेक्षित आहे, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी.

४. समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत नागरिकांमध्ये सर्व स्तरावर जाणीव जागृती निर्माण करण्याची सर्व संबंधितांनी विशेष काळजी घ्यावी.

५. सर्व संबंधित यंत्रणांनी राज्यातील सर्व नागरिकांना दिनांक १७ ऑगस्ट रोजी, सकाळी ११.०० वाजता आहे त्या ठिकाणी थांबून राष्ट्रगीत गायन करण्याचे आवाहन करण्यात यावे.

६. खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय व निम शासकीय कार्यालये, केंद्र शासन व राज्य शासनाशी संबंधित कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनीही या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणे आवश्यक राहील, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

७. शाळा / महाविद्यालय / शैक्षणिक संस्था / विद्यापीठे येथे या उपक्रमाबाबत सर्व विद्यार्थ्यांना अगोदरच विस्तृत माहिती देण्यात यावी. सर्व सरकारी / खाजगी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था / शासकीय व निम शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर उपक्रमात सहभागी होणे अनिवार्य राहील.

८. राष्ट्रगीत गायनासाठी विद्यार्थ्यांनी मोकळे पटांगण, वर्ग खोली, किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहावे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग होणे आवश्यक राहील, यासाठी शालेय शिक्षण विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सर्व संबंधितांना निर्देश द्यावेत.

९. ग्राम स्तरावर, वॉर्ड स्तरावर ( नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत/ महानगरपालिका स्तरावर), सर्व प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी ग्राम विकास व पंचायत राज विभाग व नगर विकास विभाग यांनी सर्व संबंधितांना निर्देश द्यावेत.

१०. जिल्हाधिकारी यांनी या उपक्रमासाठी जिल्ह्याचे संनियंत्रण करावे, तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय, सहकारी तसेच खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था यांना जिल्हाधिकारी स्तरावरून या उपक्रमाबाबत अवगत करून समूह राष्ट्रगीत गायनासाठी जाहीर आवाहन करावे. तसेच तालुकास्तरावर तहसीलदार यांनी या उपक्रमाचे संनियंत्रण करावे.

११. या कार्यक्रमाच्या जाणीव जागृती आणि प्रचार व प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात मुद्रित साधने, समाज माध्यमे, खाजगी वाहिन्या, रेडिओ, एफ एम रेडिओ, कम्युनिटी रेडिओ इत्यादी माध्यमांचा वापर करावा.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२२०८१०१८२९२६०२२३ असा आहे.
विद्यार्थ्यांत देशप्रेम व राष्ट्रीय एकात्मता जागृत करणार्‍या या उपक्रमाचे विविध स्तरावरून स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!